बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्याच्या भूमीतून पुन्हा एकदा कर्तृत्वाची जोरदार गर्जना! उत्तराखंडमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठित शेरू क्लासिक NPC विभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा 2025 मध्ये देशभरातील नामांकित स्पर्धकांना धूळ चारत बुलडाण्याच्या कुणाल गांधी यांनी ७५ किलो पुरुष गटात सुवर्ण पदक पटकावले. एवढ्यावरच न थांबता भल्याभल्यांना मागे टाकत त्यांनी ओव्हरऑल किताबही आपल्या नावावर मोहरला!
बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील ही स्पर्धा देशभरात मानाची मानली जाते. अशा व्यासपीठावर बुलडाण्याचा युवा दमदार ताकदीने चमकताना पाहून जिल्हाभरात आनंदाची लाट उसळली आहे. कुणाल गांधी यांच्या कामगिरीमुळे बुलडाणा जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर झळकले असून सर्वच समाजघटक, क्रीडाप्रेमी, युवा वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.कुणालच्या या ऐतिहासिक विजयामुळे बुलडाणा जिल्ह्याचा अभिमान अनेक पटींनी वाढला आहे. त्यांची ही जिद्द, शिस्त आणि प्रबळ इच्छाशक्ती जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.














