बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मागील काही महिन्यांपासून बंद असलेली बुलढाणा ते वझर आघाव मुक्कामी बस फेरी तात्काळ सुरू करण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केली असून, तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सहदेव लाड यांनी विभागीय नियंत्रक बुलढाणा यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ही बसफेरी गेल्या 25 वर्षांपासून नियमित सुरु होती. बुलढाणा–किनगाव जट्टू–भुमराळा–वझर आघाव हा मार्ग शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरला होता. मात्र काही महिन्यांपासून बस बंद असल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तर शेतकऱ्यांना बाजारपेठ व कामानिमित्त जिल्हा ठिकाणी पोहोचण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होत आहे. शासनाने तत्काळ बससेवा पुन्हा सुरू न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा इशारा सहदेव लाड यांनी दिला आहे. या निवेदनावर अनिल लांडगे यांचीही स्वाक्षरी आहे.














