बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पुण्यातील अमोडिया कंपनीच्या 1800 कोटींच्या जमीन व्यवहारासारखाच एक धक्कादायक घोटाळा आता बुलढाण्यात उघडकीस येत आहे! बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावातील तारे परिवाराच्या सामूहिक 28 एकर शेतीपैकी तब्बल 14 एकर जमीन नियमबाह्य पद्धतीने छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्या नावावर खरेदी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
तारे परिवाराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत “ही जमीन अजून हिस्सेवाटणी न झालेली असताना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटे कागद तयार करून जमीन बेकायदेशीररित्या विकली गेली,” असा स्फोटक आरोप करण्यात आला. या घोटाळ्यामागे स्थानिक राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहारांचा मोठा खेळ असल्याची चर्चा बुलढाण्यात चांगलीच रंगली आहे.
तारे परिवाराने प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत या प्रकरणाची सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणात संबंधित अधिकारी गप्प बसले आहेत, तर राऊत यांच्याकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.या 14 एकर शेतीच्या व्यवहारामागे नक्की कोण? कोणाच्या दबावाखाली झाला हा सौदा? ‘हॅलो बुलढाणा’ लवकरच उघड करणार या संपूर्ण प्रकरणाचं गुंतागुंतीचं रहस्य!














