बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ०१ नोव्हेंबरच्या सकाळी साडेसहाच्या आसपास फोनची ‘रिंग’ वाजली… शनिवार असल्यानं थोडं उशिरापर्यंत झोपावं, असं झोपतांना ठरवलेलं….मात्र, या फोनने माझी ‘गुड मॉर्निंग’ लवकरच झाली. फोनच्या स्क्रिनवर ‘आजतक’ धनंजय साबळे असं नाव दिसलं… फोन उचलल्यावर तिकडून धनूभाऊ बोलायला लागलेत. अन माझ्या डोळ्यात असलेली उरलीसुरली झोप ताडकन उडून गेली. ते म्हणालेत, “अरे उमेश!, विठ्ठल महल्ले यांच्या मुलीचा दिल्लीत रात्री मोठा अपघात झालाय. तिला ‘एम्स’मध्ये भरती करण्यात आलंय. पण, तिच्यासोबत घरचे कुणीच नाही. तिच्यासोबत शिकणारे मित्र-मैत्रीणीच फक्त दवाखान्यात आहेत. विठ्ठल कुटुबासह तातडीने दिल्लीकडे निघाला आहे. परंतू, त्याचे नागपूरातून दुपारी पावणेदोनचे विमानही एक तास उशिरा जाणार आहे. तू दवाखान्यात उपचार चांगले मिळावेत यासाठी काही करता येते का?, बघ”.
सकाळी साडेसहाच्या फोनवरील या संभाषणानं मी पुरता हादरलो. कुणाला फोन करावा हे सुचत नव्हत. ‘गुड मॉर्निंग’च्या पहिल्या प्रहरात या ‘बॅड’ बातमीनं मा पार सैरभार झालो. तितक्यात लगेच डोक्यात लख्ख प्रकाश पडल्यासारखं एक नाव समोर आलं. ते नाव होतं माझे मित्र सोहम वायाळ साहेब यांचं. वायाळसाहेब आयुष मंत्रालयाची महाराष्ट्रातील महत्वाची जबाबदारी सांभाळणारा अन शेती-मातीशी नातं असलेला एक संवेदनशील अधिकारी. इतक्या सकाळी फोन कसा लावावा?, हा प्रश्न मला फक्त क्षणभरच पडला. कारण, या माणसाला कधीही फोन करू शकतो, हा आत्मविश्वास होता. फोन केल्यावर माझ्या फोननेच सर उठलेत. त्यांना सर्व घटना आणि परिस्थिती सांगितली. त्यांनी अगदी आपुलकीने काळजी करू नका, म्हणून आश्वस्त केले. आपल्या मुलीसारखीच असलेल्या मित्राच्या मुलीच्या काळजीने उडालेला मनाचा थरकाप काहीसा कमी झाला.
मात्र, पुढचा संपुर्ण अनुभव अत्यंत थक्क करणारा होता. सोबत तो एक मंत्री आणि त्यांच्या ‘टीम’च्या संवेदना आणि आपुलकीने ओतप्रोत भरलेल्या सामाजिक बांधिलकीच्या अनुभवाचा होता. वायाळ साहेबांनी माझ्या फोननंतर अत्यंत वेगाने सर्व सुत्रं आपल्या हाती घेतलीत. याची माहिती त्यांनी केंद्रीय आषुषमंत्री प्रतापराव जाधव साहेबांना दिली. अन त्यानंतर सर्वच सुत्रं अगदी वेगाने हलू लागलीत. सुहानीला तातडीने ‘राम मनोहर लोहिया रूगाणालया’तून ‘एम्स’मध्ये हलवण्यात आलं. सुहानीला दुचाकीच्या धडकेत गंभीर मार लागला होता. दुपारपर्यंत ती शुद्धीत नव्हती. सर्व रूग्णालय प्रशासन सुहानीला वाचवण्यासाठी कामाला लागले. प्रतापराव जाधव आणि त्यांची संपुर्ण ‘टीम’ परिस्थितीवर लक्ष ठेवून होती. सर्वांची मेहनत, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि सर्वांची प्रार्थना आता फळाला आली होती. दुपारी सुहानी शुद्धीवर आली. ती बोलली अन सर्वजण आश्वस्त झालेत.
लढाई येथेच संपली नव्हती. ती शुद्धीत येईपर्यंत अर्धी लढाई आपण जिंकलो होतो. पुढे या अपघातात अनेक ठिकाणी तिला दुखापती आणि ‘मल्टीपल फ्रॅक्चर’ झाले होते. ०१ तारखेला रात्री विठ्ठलभाऊ आणि कुटूंबिय विमानाचा ‘डिले’ अन इतर अनेक अडचणींवर मात करीत मजल-दरमजल करत दिल्लीत पोहोचलं. या सर्व प्रवासात विठ्ठलभाऊ आणि माझ्या संपर्कात सोहम वायाळ साहेब, जाधव साहेबांचे ‘ओएसडी’ आचल भाटिया साहेब, डॉ. सचिन पऱ्हाड होते.
यासंदर्भात खासदार अनुभव धोत्रे यांची झालेली मदतही पार शब्दांच्या पलीकडची. मी अनुपभाऊंच्या कानावर हा विषय टाकला. आणि त्यांचाही विश्वास ‘टीम प्रतापराव जाधव’ यांच्यावरच होता. त्यांनी डीके साहेबांचा नंबर दिला. त्यांचीही मोठी मदत झाली. दिवसभरात अनुपभाऊंनी अनेक वेळा परिस्थितीची माहिती घेतली. काही अडचण असली तर केव्हाही फोन करा, हे आवर्जून सांगायला अनुपभाऊ विसरले नाहीत.
आमचे मित्र विठ्ठल भाऊ महाले यांची मुलगी सुहानी ही दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाची पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. सुहानी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शतपावली करत असताना भरधाव स्पोर्ट्स बाईकची जोरदार धडक बसून गंभीर जखमी झाली होती. दिल्लीत अपघात झाल्याने आपल्याला कोण मदत करेल?, कसं होईल?, या चिंतेत आम्ही सर्वजण असतांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि त्यांची सर्व टीम आमच्या मदतीला ‘देवदूत’ म्हणून धावली. दोन दिवसांपूर्वीच सुहानीचं एक मोठं ऑपरेशन झालं असून आणखी काही छोट्या शस्त्रक्रिया कराव्या लागण्याची शक्यता आहे. मात्र, उपचार सुरू असताना आलेल्या प्रत्येक अडचणीतत ही ‘टीम’ विठ्ठलभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. उपचार करताना आलेल्या प्रत्येक अडचणीत या टीमने विठ्ठलभाऊंना आपल्या घरच्या माणसासारखी हिंमत दिली. अगदी जेवण आणि राहण्यापासून विचारपूस करण्यापर्यंत दिवसातून प्रत्येकदा त्यांच्याशी बोलून व्यवस्थोत काही कमी तर नाही ना?, याची माहिती सर्व टीम घेत होती.
या संवेदनेच्या प्रवासातील सर्वात मोठा कळस म्हणजे आजचा दिवस. आज सुहानीला भेटण्यासाठी स्वतः प्रतापराव जाधव साहेब दवाखान्यात आलेत. आज त्यांनी दवाखान्यातील सुहानीसोबत संवाद साधला. आपल्या लेकीप्रमाणे त्यांनी सुहानीला बापाच्या मायेनं सांगितले की, “बेटा!, कोणतीही काळजी करू नकोस. मी आणि आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत”. एका बापाच्या मायेने एका मंत्र्यांना फिरवलेला मायेचा हात सुहानीला नक्कीच बळ देणारा आहे. यावेळी जाधवसाहेबांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून काळजीपूर्वक तातडीने उपचार करण्याचे स्पष्ट निर्देश ‘एम्स’ प्रशासनाला दिलेत.
या संपूर्ण अनुभवातून प्रतापराव जाधव या राजकारणातील दिग्गज असलेल्या नेत्याच्या पलीकडचा संवेदनशील माणूस समजला. केंद्रात मंत्री असतांनाही हा माणूस आपली मूळं विसरला नाही. रुग्णसेवेतूनच राजकारणात पदार्पण केलेल्या प्रतापराव जाधव यांनी आजही आपल्या रुग्णसेवेचा आणि समाजसेवेचा वसा सोडलेला नाही, हे दाखवणारा हा अनुभव. या संपूर्ण अनुभवात प्रतापराव जाधवांमधला नेत्याच्या पलीकडचा एक संवेदनशील माणूस आणि एक हळवा बापही अनुभवायला मिळाला. ज्या समाजसेवा आणि रुग्णसेवेचा वसा प्रतापराव जाधव साहेबांनी घेतला तोच वसा त्यांची ‘टीम’ पुढे नेत आहे ., दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आपला कोण वाली आहे?, असा प्रश्न पडणाऱ्यांसाठीचे उत्तर म्हणजे ‘प्रतापराव जाधव’ आहेत असा हा अनुभव सांगून गेला.
या सर्वांना धन्यवाद तर म्हणणार नाही. कारण आम्हा सर्वांना या सर्व लोकांच्या कायम ऋणात रहायला आवडेल. प्रतापराव जाधव साहेब, खासदार अनुपदादा धोत्रे, सोहम वायाळ साहेब, मंत्र्यांचे ‘ओएसडी’ आचल भाटियाजी, डॉ. सचिन पऱ्हाड , डॉ गोपाल डिके , ‘एम्स रूग्णालय प्रशासन’ आणि सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी ‘टीम’ या सर्वांनी या सर्व प्रवासात केलेली मदत ही शब्दांच्या पलीकडची आहे. आलेली वेळ ही निघून जातेच. मात्र, या काळात मदत करणारी, पाठिशी उभी राहणारी माणसे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम स्मरणात राहतात.
आपण व्यक्ती म्हणून सदैव आपल्या राजकीय नेत्यांना नावे ठेवत असतो. अनेकदा ते परिस्थितीनुसार एकदम योग्यही असतं. परंतु, प्रतापराव जाधव यांच्यासारखे राजकारणी सर्वार्थाने वेगळे असतात. कारण, आकाशात उडतांनाही ही माणसं आपलं जमिनीशी असलेलं नातं आणि नाळ तुटू देत नाहीत. ‘घार उडे आकाशी , तिचे लक्ष पिलापाशी’ याचं उदाहरण म्हणजे प्रतापराव जाधव साहेब. आपल्या संवेदनेमूळे एका लेकीचे प्राण वाचलेत.
अशा पद्धतीने ही माणसं आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या सर्वसामान्य माणसाला कधीच विसरत नाहीत. म्हणूनच, सर्वार्थाने ती मोठी असतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केंद्रातल्या त्यांच्या पक्षासाठीच्या एकमेव मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव यांचे नाव का निवडलं असावं?, याचे उत्तरही या अनुभवाने दिलंय. त्यामुळे दिल्लीत कधी कोणत्याही मराठी माणसाला अडचण आली तर त्या अडचणीचं उत्तर प्रतापराव जाधव यांच्यासारखी सविनशील माणसं निश्चितच असतील यात कोणतीही शंका नाही. प्रतापराव जाधव साहेब आणि ‘टीम प्रतापराव जाधव’ तुमच्यातील संवेदनेचा हा कारवाँ कायम असाच उत्तरोत्तर वाढू द्या, अशी अपेक्षा














