मेहकर (हॅलो बुलढाणा) मानवी संवेदनांना काळी छाया पडावी, अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना मेहकर शहरात घडली आहे. तापामुळे मृत झालेल्या दीड वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मोकाट कुत्र्यांनी उकरून काढून विद्रुप अवस्थेत फाडल्याने शहर हादरून गेले आहे!
ही चिमुकली जानेफळ रोडलगत झोपडीत राहणाऱ्या भटकंती करणाऱ्या गरीब कुटुंबातील होती. ६ नोव्हेंबरच्या रात्री तापाने तिचा मृत्यू झाला. आर्थिक अडचणीमुळे आई-वडिलांनी मानभाव पंधीय मंदिराजवळ खुल्या जागेत घाईघाईत अंत्यसंस्कार केले. पण त्यांनी खोदलेला खड्डा अतिशय कमी खोलीचा असल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे मोकाट कुत्र्यांनी तो उकरून काढला आणि चिमुकलीच्या मृतदेहाचे लचके तोडले!
सकाळी स्थानिक नागरिकांनी विद्रुप अवस्थेतील मृतदेह पाहून संतापाने आक्रोश केला. सुरुवातीला परिसरात ‘अज्ञातांनी बालिकेची हत्या केली’ अशी अफवा पसरली. मात्र मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमला बोलावले. चौकशीत ही घटना हत्या नसून, दुर्लक्ष आणि बेघरपणामुळे झालेली भयंकर दुर्घटना असल्याचे स्पष्ट झाले.














