नांदुरा (हॅलो बुलडाणा) नगरपरिषदेकडील स्वच्छता उपक्रमात गंभीर निष्काळजीपणाचा धक्का बसला आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत दाखल झालेल्या तब्बल 13 घंटागाड्या – आठ छोटा हत्ती (फोर व्हीलर) आणि पाच थ्री व्हिलर अॅपे – आजही शहरात विना नंबर प्लेट फिरताना दिसत आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर या गाड्या कचरा गोळा करतात, पण त्यांच्यावर वाहन ओळख क्रमांकच नाही! हा प्रकार नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण करणारा आहे.
जर एखाद्या दिवशी या गाड्यांनी चुकून अपघात घडवला, तर कोणती गाडी, कोणत्या चालकाने हा प्रकार केला हे शोधणे अशक्यप्राय ठरणार. नवीन गाड्यांना पासिंग आणि TR नंबर देण्याची कायदेशीर प्रक्रिया 7 ते 8 दिवसांत पूर्ण व्हावी लागते आणि TR स्टिकरची मुदत जास्तीत जास्त एका महिन्याची असते. मग चार-पाच महिन्यांनंतरही नंबर प्लेट का नाही? हा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारत आहे.
यामागे नगरपरिषद, संबंधित ठेकेदार आणि RTO कार्यालय यांच्यातील उदासीनता आहे की कोणाचे तरी “आशीर्वाद”? शहरात कायद्याला डावलून निष्काळजीपणाने धावणाऱ्या या गाड्या नेमक्या कोणाच्या संरक्षणाखाली आहेत हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे.संबंधित ठेकेदाराने तात्काळ RTO कार्यालयात गाड्यांची नोंदणी करून नंबर प्लेट बसवावी, अन्यथा नागरिक स्वतः RTO अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशारा व्यक्त करत आहेत.














