बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सागवन ग्रामपंचायत हद्दीतील समता नगर परिसरातील मुलांचे एकमेव प्ले ग्राऊंड आता धोक्यात! या मैदानावर विविध शासकीय वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला असून, आज सकाळी भूमिपूजन पार पाडण्यात आले. मात्र, स्थानिक महिला आणि नागरिकांनी हे मैदान हिरावून घेण्याच्या प्रयत्नावर जोरदार आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.नागरिकांचा आरोप आहे की, गेल्या २०-२५ वर्षांपासून हे मैदान मुलांच्या खेळांसाठी व ज्येष्ठ नागरिकांच्या व्यायामासाठी वापरले जाते. याच मैदानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी वारंवार आमदार संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु, नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भूमिपूजनाचा कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे पीए कृष्णा शिंदे यांनी महिलांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा धक्कादायक आरोप महिलांनी केला आहे.महिलांनी स्पष्ट भूमिका घेतली की- खेळाच्या मैदानावर इमारती उभ्या करणार असाल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.
स्थानिकांनी ग्रामपंचायत व सरपंचांवर संताप व्यक्त करत सांगितले की,या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आमच्यापासून लपवण्यात आली. खेळाचे मैदान नष्ट करून भविष्यातील पिढीचे खेळाचे स्वातंत्र्य काढून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला.














