चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) जालना-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला! चिखलीजवळ एका मध्यधुंद महिलेने महामार्गाच्या मध्यभागीच झोपून अक्षरशः गोंधळ घातला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि चालकांमध्ये भीती व संताप दोन्ही निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ही महिला अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होती. ती कधी रस्त्यावर झोपत होती तर कधी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर उभी राहत होती. अचानक समोर आलेल्या या दृश्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली आणि अपघाताचा धोका टळला. काही नागरिकांनी पुढाकार घेत महिलेला उचलून रस्त्याच्या कडेला नेले.
दरम्यान, त्या महिलेबरोबर असलेला एक युवकही नशेत असल्याचे दिसून आले. त्याने काही वेळाने आपली कार आणून ती महिला कारमध्ये बसवली आणि मोठ्या घाईत जालना दिशेने निघून गेला. या दरम्यान संपूर्ण परिसरात प्रचंड बघ्यांची गर्दी झाली होती.घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असली तरी, महिला आणि तिच्यासोबतचा युवक कोण होते, ते कुठून आले आणि कुठे गेले याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही. महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांचे हाल झाले.




















