बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा निसटता विजय हा प्रत्यक्षात “बोगस मतांचा खेळ” असल्याचा स्फोटक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी केला आहे! त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करत ७४०० दुबार आणि तब्बल ५२९१ मयत मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये असल्याचे उघड केले आहे.
शेळके यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या फक्त ८४१ मतांनी पराभूत झाल्या, मात्र आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार निवडणुकीत प्रचंड बोगस मतदान झाले. अनेक घरांच्या पत्त्यासमोर “०”, “०००” किंवा अ, ब, क अशी अक्षरे लिहिलेली आहेत, तर काही ठिकाणी एकाच नावाची नोंद दोन-तीन ठिकाणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर मृत व्यक्तींची नावेही मतदार यादीत कायम आहेत.
मोताळा तालुक्यातील निपाना गावात ११२६ लोकसंख्येतील तब्बल १३२ मयत व्यक्तींची नावे अद्याप यादीत असून, सुंदरखेडमध्ये २०१० मध्ये मृत झालेल्याचेही नाव कायम असल्याचे शेळके यांनी निदर्शनास आणले.
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनीही बुलढाणा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांचे संपूर्ण पुनर्रनिरीक्षण करून मयत आणि दुबार नावे वगळण्याची मागणी केली आहे.
या मतांचा घोळ थांबवला नाही, तर लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभे राहील, असा इशारा शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे.




















