चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे! सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी सुमारे 9:30 वाजता कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे फार्मसी कॉलेज समोर असलेल्या नाल्यात आढळून आला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात स्वप्निल हा नाल्यात पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहून गेलेला हा युवक अखेर कॉलेजसमोरील नाल्यात अडकलेला अवस्थेत मृतावस्थेत सापडला आहे.
दरम्यान, स्वप्निल हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी काल दिनांक 26 ऑक्टोबर रोजी चिखली पोलीस स्टेशनला दिली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती आणि अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतदेह पीएमसाठी जिल्हा उपरुग्णालय चिखली येथे हलविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कदम आणि रोहिदास पंढरे करीत आहेत.




















