बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीने आता अक्षरशः ‘बिहार’ची आठवण करून दिली आहे! काल एकाच दिवसात तब्बल चार खून – कुठे विकृत बापाने जुळ्या मुलींना चाकूने कापलं, कुठे मटण मार्केटमध्ये रक्ताच्या तळ्यात खून, तर कुठे उघड्यावरच चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या! जिल्ह्यातील नागरिकांच्या तोंडून एकच प्रश्न — “एसपी तांबे साहेब, हे गुन्हेगार कायद्याला जुमानणार की नाही?”
पहिली घटना सर्व मानवतेला काळिमा फासणारी!
अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुई (जि. वाशिम) येथील राहुल चव्हाण या बापाने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा चिरून निर्दयपणे खून केला. पत्नीशी किरकोळ वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने दोन्ही निरपराध लेकरांना जंगलात नेऊन निर्दयतेने मारले! या घटनेने जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले आहे.
दुसरी घटना शेगावमध्ये – मटण मार्केटमध्ये मर्डर!
संत नगरी शेगाव येथे नितीन उर्फ गोल्या गायकवाड (३५) याची मटण मार्केटमध्ये हत्या झाली. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या खुनाने शहरातील शांततेला चिर बसला आहे. गर्दीतच हत्येचे नाट्य घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
आणि तिसरी धक्कादायक घटना – अंढेरा पुन्हा रक्तरंजित!
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे आकाश उत्तम चव्हाण (२५)याची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे ही घटना अंढेरा पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावरच घडली! आरोपी अयान सय्यद नासीर (१८–२०) याने उघड्यावरच तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करत आकाशचा बळी घेतला.
एका दिवसात चार मर्डर, जिल्हा पोलिस मात्र गप्प!
हे प्रकार पोलिसांच्या नाकावर टिच्चून होत असताना, गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. अवैध धंद्यांना चालना, गस्त व्यवस्थेतील त्रुटी आणि काही ठिकाणी राजकीय पाठबळामुळे गुन्हेगारीवर लगाम सुटल्याचे स्पष्ट दिसते.एसपी तांबे साहेब, जिल्ह्यातील नागरिक आता ठोस कारवाईची मागणी करत आहेत! गुन्हेगारांना ‘उलटे लटकवून’ कायद्याची ताकद दाखवली नाही, तर बुलढाणा जिल्हा लवकरच ‘बिहार मॉडेल’कडे झुकू शकतो — अशी जनतेची तीव्र प्रतिक्रिया आहे! संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे, संतापाचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे.बुलढाण्याला रक्तरंजित अध्यायातून मुक्ती कधी मिळणार?




















