देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) प्रतितिरुपती म्हणून ओळख असलेल्या श्री बालाजी महाराजांचा आगळा वेगळा व केवळ देऊळगाव राजा शहरात पार पडणारा लाटामंडप उत्सव श्रींच्या जयघोषात व भक्तांच्या असीम उत्साहात संपन्न झाला.
मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारावरील नगारे आणि गोविंदा गोविंदा चा उदघोष तसेच बोल बालासाहेब की जय, लक्ष्मी रमण गोविंदा या जयघोषात श्री बालाजी मंदिर परिसर दुमदुमून निघाला.
मानकरी, भाविक भक्तांनी अवघ्या साडे तीन तासात ४२ मंडपाला दोर बांधून दिड फुट व्यास व बत्तीस फुट उंचीच्या २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी केली. महाद्वाराशेजारील हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती व संस्थानसमोरील गरुडाची दगडी मूर्ती या दोन्ही मुर्त्यांना हा अखंड दोर बांधून महाकाय लाटामंडप उभारण्यात आला. या कार्यासाठी मानकऱ्यांचे व सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले. लाटामंडप उभारणीनंतर सर्व मानकऱ्यांना श्री बालाजी संस्थानच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला.
श्री बालाजी संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आश्विन शु. ९-१० अर्थात बुधवार, दि. १ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून गुरुवार, दि. २ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत श्रींची पालखी मिरवणूक होईल. आश्विन कृ. ४ म्हणजेच शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५:४५ वा. लळितोत्सव संपन्न होईल.
सर्व भाविकांनी दर्शनाचा, प्रसादाचा व यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.
भाविक भक्तांना सहजतेने कानगी तसेच शाश्वत अन्नदान देणगी देता यावी, यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने दोन स्वतंत्र क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांनी त्या क्यूआर कोडचा वापर करून देणगी जमा करावी, असे आवाहन श्री बालाजी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.