बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे सेतू केंद्रात बोगसपणा सुरू असून, हे सेतू की राहू.. केतू ? असा प्रश्न उपस्थित झालाय.दरम्यान अधिवास प्रमाणपत्रासाठी टीसी मध्ये खाडाखोड करणारे 2 सेतु केंद्र 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांना शासकीय प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी कार्यान्वित सेतू केंद्रामार्फत अनेक खोटी कामे केली जात आहे. बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी अशीच खोटी कामे करणारे 2 सेतू केंद्र कायमचे रद्द केले असून आता पुन्हा 2 सेतू केंद्रांना 6 महिन्यासाठी निलंबित केले आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व बनावट कागदपत्रा द्वारे खोटी कामे करणाऱ्या सेतू केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.बुलढाणा तालुक्यातील सिंदखेड येथील सेतू केंद्र चालक सतीश निंबाजी पानपाटील आणि सावळा येथील भाग्यश्री उत्तम थुट्टे यांनी अधिवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन कागदपत्रे अपलोड केली होती. यामध्ये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात खाडाखोड केल्याचे समोर आल्याने बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी चौकशी करून दोन्ही सेतू केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. दोन्ही केंद्र चालकांचा बयान बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी घेतला तसेच केंद्र चालक दोषी आढळल्याने त्यांनी एका आदेशान्वये सदर दोन्ही सेतु केंद्र 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाने आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे.यापूर्वी बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील गणेश श्रीकृष्ण गुंडकर आणि बिरसिंगपूर येथील विकास शिंदे या दोघांचे सेतू केंद्र कायमचे रद्द करण्यात आले आहे. यासोबतच खोटी कामे करणारे बुलढाणा तालुक्यातील इतर काही सेतू केंद्र चालकावर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे.