शेगाव (हॅलो बुलढाणा) राज्यात आरक्षणावरून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्यात येत आहे. ओबीसी विरुद्ध ओबीसी असा लढा उभारण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली आरक्षणावरील भूमिका जाहीर व स्पष्ट करावी. तसेच यावर जातनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबीर रविवारी १४ सप्टेंबर रोजी येथील हॉटेल विघ्नकर्ता इन मध्ये पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून युनिटी ऑफ मुलनिवासी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी अभ्यासक कमलकांत काळे, जीएसटी विभागाचे माजी सहायक आयुक्त आणि एससी, एसटी, ओबीसी कर्मचारी वेल्फेअर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थुल, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना सुनील शेळके यांनी २०१८ मध्ये स्थापन झालेल्या संघटनेच्या आजवरच्या कामागिरीचा धावता आढावा घेतला. ते म्हणाले, संघटनेने ओबीसीमधील मरगळ दूर केली. काही लघु तर काही दीर्घकालिक ध्येय निश्चित केली. त्यादृष्टीने मार्गक्रमण केले. चळवळीचे काम काम करताना संघटनेने आधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतले. २४ तास लढणारी संघटना अशी ओळख निर्माण केली. ओबीसी बांधवांनी आपला खरा शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखणे काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. संघटना जातनिहाय जनगणनेसाठी आग्रही आहे. यावर जन जागृतीसाठी संघटना वर्षभर राज्यात जातगणना परिषद आयोजित करण्याची घोषणा शेळके यांनी केली.
▪️आरक्षण ही राष्ट्रनिर्माणाची योजना : कमलकांत काळे
उद्धघाटकीय सत्रात ओबीसी समाजाचे अभ्यासक व लेखक कमलकांत काळे यांनी ‘ओबीसी आरक्षण : सामाजिक लढा व आताची परिस्थीती’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. संविधानाने दिलेल्या आरक्षणाचे विविध पैलू त्यांनी उलगडून सांगितले.
चळवळीमध्ये सातत्याने प्रबोधन, प्रशिक्षण आणि सुदृढ संघटन असणे अत्यावश्यक ठरते. झोपेचे सोंग घेणाऱ्यापेक्षा जागृत असण्याचे सोंग करणारा संघटना व समाजासाठी जास्त घातक ठरतो. आरक्षण म्हणजे पहिल्या पंक्तीत जेवण्याची संधी नसल्याचे सांगून त्यांनी मुळात पंगत वाढण्याची व्यवस्थाच आपल्याकडे असणे आवश्यक आहे. ओबीसीना आरक्षण हा ऐतिहासिक क्षण ठरला. मात्र त्याविरोधात अदृश्य शक्तींनी विविध अडचणी, अदृश्य भिंती उभ्या केल्या. तेंव्हा यात्रा काढण्यात आल्या. अलीकडे आरक्षण विरोधात खाजगीकरण, कंत्राटी कर्मचारी नियुक्ती याचा वापर करण्यात आला. आता मार्केट, मनी आणि मीडिया याचा वापर करण्यात येत असून हा आधुनिक मनुवाद असल्याचे काळे यांनी सांगितले.
▪️ओबीसींनी निर्भयपणे लढा उभारावा: संजय थूल
जीएसटी विभागाचे निवृत्त असिस्टंट कमिशनर संजय थुल यांनी भाषणाच्या प्रारंभी दहावीत जेमतेम ४२ टक्के गुण मिळाल्यावर अगदी आयटीआय सुद्धा प्रवेश मिळाल्याचे सांगितले. मात्र महापुरुषांचे विचार, त्यांचा संघर्ष, बामसेफ संघटनाचे कार्य यातून प्रेरणा घेत नंतर अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत प्रगती केली. जिएसटीसारख्या विभागात उच्च पदावर पोहोचलो. यामुळे ओबीसी बांधवानी अपयश, पराभव याने न खचता निर्भयपणे लढा उभारण्याचे
आवाहन त्यांनी केले. मंडल आयोग अहवालाची अंमलबजावणीची घोषणा तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० रोजी केली होती. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली होती. या दोन ऐतिहासिक दिवसांच्या स्मरणार्थ ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा राज्य अधिवेशन व एक दिवशीय चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. शेगाव येथील विघ्नहर्ता हॉटेल येथे पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यातील पदाधिकारी, ओबीसी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. संचलन करतानाच राज्य सल्लागार शिवशंकर गोरे यांनी प्रस्ताविकत संघटनेच्या कामगिरीचा विस्तुत आढावा सादर केला. सरचिटणीस राम वाडीभस्मे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.अधिवेशनाला जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटेखेडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकरे, संतोष सातव, जिल्हा सहसंघटक सुधीर दाते, तालुकाध्यक्ष शेगाव प्रमोद इंगळे, खामगाव रमेश जुमळे, नांदुरा रामविजय ढोरे, संग्रामपूर शाम कौलकार,जळगाव जामोद तुषार आसोलकर,मलकापूर संजय उमाळे, मोताळा निळकंठ उचाडे, बुलडाणा गजानन पडोळ, चिखली राजाभाऊ वायाळ, मेहकर गणेश पऱ्हाड, देऊळगाव राजा संदीप शिंदे, सिंदखेडराजा नंदकिशोर खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
▪️मागील अधिवेशनाची थोडक्यात पार्श्वभूमी!
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे नेहमीच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. त्याच अनुषंगाने यावर्षीचे राज्य अधिवेशन शेगाव येथे आयोजित करण्यात आले. यापूर्वी २०२३ मध्ये संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अधिवेशन झाले होते. त्या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक द्वितीय राष्ट्रीय मागासवर्ग (मंडल) आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे नातू प्रा. सुरज मंडल उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ओबीसीचे अभ्यासक प्रा. प्रभाकर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर २०२४ मध्ये खारघर (नवी मुंबई) येथे अधिवेशन पार पडले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक प्रा. कांचा इलैया यांनी उद्घाटन केले, तर संशोधक विद्यार्थी यशवंत झगडे आणि माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले विचार मांडले. दोन्ही अधिवेशना दरम्यान विविध विषयांचे महत्वाचे ठराव सामुहीक व गट चर्चा करून संमत करण्यात आले, व त्यांची पुर्तता व्हावी याकरिता संघटनेच्यावतीने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.