मोताळा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर अँटी करप्शन विभागाने मोठा हातोडा मारला असून मोताळा तहसीलदार हेमंत पाटील लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. अकोला अँटी करप्शन विभागाने शनिवारी धाडसी कारवाई करून तहसीलदाराला जाळ्यात ओढले. तक्रारदार शेतकऱ्याची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी तहसीलदाराने तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर शेतकऱ्याने अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली आणि पथकाने सुयोजित सापळा रचून तहसीलदाराच्या बुलढाणा येथील राहत्या घरी दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना आता अटकसत्र भोगावे लागेल अशी चर्चा सुरु झाली आहे. अँटी करप्शनच्या या धाडसी कारवाईने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचे पडदे फाटले असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.