बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या पावसाळ्यातही पाणीटंचाई भासत असून, येळगाव धरणात केवळ 17 टक्के जलसाठा असल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 17 टक्केच जलसाठा शिल्लक असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जुलै अखेर पुरेल एवढाच जलसाठा असल्याने पाऊस वेळेवर येणे काळाची मागणी अधोरेखित आहे.
मागील काळात पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे. तळपत्या उन्हाने जलाशयातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. येळगाव धरणाचीही अशीच बिकट स्थिती आहे. धरणाची जलसाठा क्षमता 12.40 दशलक्ष घनमीटर आहे. आजघडीला धरणात केवळ 17 टक्के इतकाच जिवंत जलसाठा असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. हा साठा 30 जुलैपर्यंत पुरेल इतकाच आहे. यामुळे आता तरी चांगला पाऊस होणे आणि तोही पैनगंगा नदी परिसरात होणे आवश्यक आहे. अन्यथा बुलढाणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.