सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील देवखेड येथील खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून अर्धवट राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकरी दोन महिन्यांपासून शेतात जाऊ शकलेले नाहीत. काढणीला आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक कसे घरी आणावे याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. शेतात जाण्यासाठी शेतकरी थर्माकॉलच्या साहाय्याने नदी पार करत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.
या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाय न झाल्यास येत्या 20 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अन्यथा जलसमाधी आंदोलन करू, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे. तहसीलदार सिंदखेडराजा व सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगाव राजा यांच्या नावाने दिलेल्या निवेदनावर 40 हून अधिक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.सन 2018 मध्ये तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांतून पुलाचे काम मंजूर झाले होते; मात्र कंत्राटदारास मोबदला न मिळाल्याने दहा टक्के काम अपूर्ण राहिले. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व जीवितहानी टाळायची असेल तर शासनाने तातडीने या प्रश्नात हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे.