जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/गजानन सोनटक्के) जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत ही स्वच्छतेच्या दृष्टीने उदासीन दिसत असून,सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या पत्राला ग्रामसेवक जोशी यांनी केराची टोपली दाखविल्यामुळे ग्रामस्थ रोष व्यक्त करीत आहेत.
गावात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबके साचलेले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती झालेली आहे व ठीक ठिकाणी गवत हे वाढलेले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतने मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायत कडून तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये धूर फवारणी केलीच नाही. सूनगाव ग्रामपंचायत कडून नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत.. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. दरम्यान या समस्येवर बोट ठेवले असता, आरोग्य विभागाने 8 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतला या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले परंतु 3 ते 4 दिवस होऊन ग्रामसेवक यांनी कोणतीच उपायोजना न करता पत्राला सरळ केराची टोपली दाखविली आहे. यावर पंचायत समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.