मुंबई, (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली परंतु त्यामध्ये मोठा घोळ दिसून येत आहे. सन 2024 चा पिक विमा आधीच उशिरा देण्यात येत आहे आणि त्यातही अनेक शेतकऱ्यांना 19 रुपये 24रु,74रु,90रु आणि शंभर रुपये अशी अगदी अत्यल्प आणि तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असून भारतीय कृषी कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, शेतकऱ्यांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत रविकांत तुपकर यांनी आज 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. काही शेतकऱ्यांना समाधानकारक रक्कम मिळाली तर काही शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली, नेमक्या कोणत्या कायद्याने कोणत्या आधारावर ह्या रकमा देण्यात आल्या असाव्यात..?? असा संतप्त सवाल उपस्थित करून रविकांत तुपकर यांनी हा प्रश्न तातडीने मार्गे न लावल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
सन 2024 चा पिक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ह्या रकमा जमा होत आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही अत्यंत तुटपुंजी दिसून येत आहे. म्हणजे काहींच्या खात्यात १९ रुपये काहींच्या खात्यात २४ रु रुपये तर काहींच्या खात्यात ९० रुपये अशा रकमा जमा होत आहेत. ही नेमकी नुकसान भरपाई आहे की शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप करत रविकांत तुपकरांनी आज 12 सप्टेंबर रोजी मुंबई येथे अप्पर मुख्य सचिव विकास चंद्र दस्तगी यांना निवेदन दिले तसेच कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांनाही निवेदन सादर केले. यावेळी चर्चा करताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देताना दुजाभाव करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याला चांगली रक्कम मिळाली तर त्याच्याच शेजारी असलेल्या शेतकऱ्याला मात्र ५० ते १०० रुपयांच्या आत मदत मिळाली हा प्रकार चुकीचा आणि रोष निर्माण करणारा आहे. पिक विमा कंपनीने विम्याची नुकसान भरपाई देताना कोणते निकष लावले हे जाहीर केले पाहिजे. एका शेतकऱ्याला भरीव नुकसान भरपाई देता तर त्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला तोकडी मदत देऊन त्याच्या तोंडाला पाने पुसता हा प्रकार कदापिही खपवून घेतला जाणार नाही, पंचनामे करतानाच खूप मोठी गडबड विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेली आहे. पंचनामाच्या सर्वे फार्मवर कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच व शेतकऱ्याची स्वाक्षरी आवश्यक असते परंतु यांच्या स्वाक्षरी न घेता एआयसी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी परस्पर फार्म फिलअप केले आहे. हे सर्वे फॉर्म कृषी विभाग व शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे परंतु या कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वे करतानाच घोटाळा केलेला असल्यामुळे सदर कंपनी हे फार्म कृषी विभागास देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. पंचनाम्याचे सर्वे फार्म जर समोर आले तर “दूध का दूध आणि पाणी का पाणी” होऊन या कंपनीचे पितळ उघडे पडेल या भीतीपोटीच सदरची कंपनी पंचनामा फार्म देण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब रविकांत तुपकर यांनी उपसचिव प्रतिभा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची अत्यल्प व तुटपुंजी रक्कम मिळाली त्या शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, अन्यथा कृषी विभाग आणि एआयसी कंपनीला आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा कडक इशारा देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. नियम आणि निकष सर्वांना सारखे पाहिजे परंतु कंपनीने वेगवेगळे नियम आणि मनमानी पद्धतीचे निकष लावून असंख्य शेतकऱ्यांना पिकविम्याच्या योग्य मोबदल्यापासून वंचित ठेवले आहे, यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता यासंदर्भात तातडीची बैठक लावणे आवश्यक आहे. एआयसी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवून ज्या शेतकऱ्यांना अत्यल्प पिक विमा मिळाला त्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढा, अशी आग्रही मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी लावून धरली. शेतकऱ्यांना मिळालेल्या अतिशय तुटपुंज्या पिक विम्याच्या रकमेवरून शेतकरी हवालदिल झाले असून रविकांत तुपकर यांनी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे आता तुपकर नेमकी कोणती आंदोलनात्मक भूमिका घेतात आणि त्यांचे आंदोलन काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे..!