डोणगाव (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील डोणगाव येथे दिवसाढवळ्या घरफोडीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. दुपारच्या वेळी दोन वेगवेगळ्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल साडेएक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव केशवराव आखाडे (रा. डोणगाव) हे ११ सप्टेंबर रोजी सकाळी कामानिमित्त लेहणी येथे गेले होते. दुपारी १२ वाजता घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी सोन्याचे दागिने – अंगठ्या, मण्यांच्या साखळ्या, पदके, डोरले, बाळ्या आदी मिळून अंदाजे १,२०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, याच वेळेत गजानन महाराज मंदिर परिसरातील दत्ता मारोती आखाडे यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. स्टीलच्या टाकीत ठेवलेले सुमारे २९,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने उचलले. या दोन घटनांमुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.दिवसा घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या गस्त व सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरटे इतक्या बेधडकपणे फिरत असल्याने गावातील महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.