बुलडाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील लाचखोर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दिवस आता मोजले गेले आहेत! भ्रष्टाचारावर गदा आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा तर्फे नागरिकांसाठी नवा मोबाईल व व्हॉट्सअॅप क्रमांक ९४०५०९१०६४ सुरु करण्यात आला आहे. लाच मागणाऱ्या किंवा बेहिशोबी संपत्ती गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिक थेट तक्रार नोंदवू शकतात.
महसूल विभाग, तहसील कार्यालये, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, वीज महामंडळ, विक्रीकर विभाग, परिवहन विभाग, शिक्षणसंस्था, तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी करता येणार आहेत. लाच मागणारे एजंट, मध्यस्थ आणि बोगस दलाल यांनाही यामध्ये चपाट बसणार आहे.नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार असून तक्रारींची सत्यता पडताळूनच पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक भागोजी चोरमले यांनी दिली. तसेच तक्रारींसाठी हेल्पलाईन १०६४ व कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०७२६२–२४२५४८ ही उपलब्ध आहे.