बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने आज शहरात जल्लोषमय वातावरण निर्माण केले. ढोल–ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत ही शोभायात्रा मोठ्या थाटामाटात पार पडली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी दिवस-रात्र तैनात राहिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आज बाप्पाला निरोप देत अनोखा आदर्श घालून दिला. पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीची शिस्तबद्ध व दिमाखदार रचना केली गेली होती. पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला. सुरक्षा, शिस्त आणि भक्तीभाव यांचा संगम साधत या मिरवणुकीने पोलीस दलाच्या समर्पणाची झलक दाखवली. बाप्पाच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला. शेवटच्या क्षणीही संपूर्ण दलाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गणेशोत्सव यशस्वीरीत्या पार पाडला.
- Hellobuldana