बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुलढाण्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. ऍड. नाझेर काझी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेचा सन्मान केला आहे.
मुंबईत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष मा. खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते काझी साहेबांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी राज्यातील दिग्गज नेत्यांची भक्कम फौज उपस्थित होती. कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार मनोज कायंदे, तसेच नजीबभाई मुल्ला यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण साक्षीला राहिला.
या नियुक्तीद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांना नवे बळ मिळणार असून नाझेर काझी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक आक्रमकपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. बुलढाण्यात जल्लोषाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी उत्साहात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.