बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीचे अद्वितीय महत्त्व आहे.काल विसर्जनाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या लाकडी देवबाप्पांची व माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सकाळी 9 वाजता महाआरती केली अन् विसर्जन मिरवणुकीला एकच रंगत आली होती. यावेळी ‘खाकी’ने धार्मिक व सामाजिकतेचे विविध रंग उधळल्याचे चित्र दिसून आले.
इत्र त्रित्र सर्वत्र गणेश उत्सव दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे पाणावल्या डोळ्यांनी विसर्जन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव च्या प्रसिद्ध असलेल्या मानाच्या लाकडी गणपतीला विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महत्त्व असते,अव्वल स्थानी श्री मानाचा लाकडी गणपती त्यांनंतर तानाजी गणेश मंडळ , हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ, ही चार मंडळ दरवर्षी मिरवणुकीच्या आधी असतात. त्यानंतर इतर गणेश मंडळाचे लकी ड्रॉ प्रमाणे काढण्यात आलेल्या नंबर नुसार एकुण 29 गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वी मानाच्या लाकडी गणपतीचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणरायाची आरती करून सकाळी 9 वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा त्यांच्या परिवारासह उपस्थित होते. तर मिरवणूक मार्गावर मुख्य ठिकाणी न.प. व पोलिस प्रशासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तर विसर्जन मिरवणूक मार्गावरील निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी वेस हे बोरीपुरा पर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. मिरवणुक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर राहणार आहे. तर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर हे त्यांच्या तानाजी मंडळासह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.














