बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्यात आज धार्मिकतेसोबत सामाजिकतेची जाणीव देणारा क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा उत्साह, थाटामाट आणि भावनिक वातावरणात पार पडला. डफड्यांचा गजर, डीजेची धमाल, महिलांचा फुगडी खेळ आणि तरुणांचा चौकट डान्स यामुळे परिसर दणाणून गेला. मात्र, निरोपाच्या क्षणी सर्वांचे डोळे पाणावले – बाप्पांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यंदा सामाजिक भान जपत आगळावेगळा उत्सव साजरा केला. सौ. शर्वरीताई तुपकर यांच्या संकल्पनेतून उभारलेला शेतकरी आंदोलनाचा देखावा सोशल मीडियावर गाजला. खास म्हणजे, दररोज आरतीचा मान समाजातील वंचित, संघर्षशील आणि प्रेरणादायी व्यक्तींना देण्यात आला. दत्तक कन्या, शहीद जवानांच्या पत्नी, रिक्षा चालवणाऱ्या महिला, पंक्चर कामगार, दूध उत्पादक शेतकरी, विशेष सेवा पदकप्राप्त पोलिस, नर्सेस आणि सेवानिवृत्त सैनिक या सर्वांचा सन्मान झाला.लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड देण्याची परंपरा या मंडळाने खऱ्या अर्थाने साकारली. विसर्जनावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बाप्पांना पैनगंगा नदीत विसर्जित केले. “शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळो, शेतमालाला योग्य भाव मिळो”अशी प्रार्थना करत त्यांनी शेतकरीहिताचा आवाज बुलंद केला.