बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उत्सव म्हणजे ढोल-ताशांचा गजर असे समीकरणच झाले आहे. अलीकडे हृदयाची धडधड वाढविणारे डॉल्बी आणि डीजे साऊंड आलेत. त्यामुळे ‘आवाज नको वाढवू डीजे तुला आईची शपथ हाय’ असे यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकी निमित्त सांगण्याची वेळ आली आहे.
सण-उत्सवात डॉल्बी आणि डीजेच्या आवाजाने कानाचे पडदे फाटतात की काय असे वाटायला लागते. त्यामुळे उत्सवांना पारंपरिक वाद्यांची जोड दिल्यास संस्कृतीचे दर्शन घडेल आणि उत्सवांमधील प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाला आनंद घेता येईल यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक वाद्यांची जोड देऊन उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सार्वजनिक उत्सव साजरे करीत असताना शासनाने ध्वनीसाठी डेसिबलची मर्यादा दिली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, रात्री ७०, तर व्यावसायिक क्षेत्रात दिवस ६५, रात्री ५५ इतकी डेसिबलची मर्यादा आहे. तसेच, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ इतकी मर्यादा आहे. मात्र, अलीकडे ढोल ताशा पथक किंवा डीजे म्युझिक सिस्टीममध्ये असलेल्या स्पर्धेमुळे ही मर्यादा पाळणे शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डेसिबलची मर्यादा केवळ नियमापुरतीच असल्याचे दिसून येते. मोठ्या आवाजासाठी स्पर्धा दिसते. जिल्ह्यासह शहरांमध्ये दिवसेंदिवस गणेश मंडळांची संख्या वाढत आहे. कालांतराने त्यांच्यातच राजकारण सुरु होऊन दुसरे मंडळ काढले जाते. आरास, सजावटीपेक्षा मिरवणुकांसाठी मोठा खर्च केला जातो. समोरच्या मंडळाला आव्हान देण्यासाठी मिरवणुकांमध्ये साऊंडच्या भिंती वाढविल्या जातात. ज्या मंडळाच्या डीजेचा आवाज मोठा, त्या मंडळाची मिरवणूक मोठी, असा एक गैरसमज तरुणांमध्ये पसरलेला आहे.त्यामुळे डीजेच्या ध्वनीची मर्यादा पाळणे गरजेचे झाले आहे.