बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सण- उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे कारवाईचा बडगा उगारत आहेत.त्यांच्या व जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशाने अंमली पदार्थ माफिया हैदर खान अन्वर खान रा. हरी फैल, खामगाव याच्यावर एमपीडीए कायद्याखाली कारवाई करण्यात येऊन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या अभिलेखावर गांजा तस्कर,मालमत्ता व शरीराविरुद्ध अवैध दारू आणि इतर तत्सम गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्याला आळा घालण्याबाबत 1981 अधिनियमा प्रमाणे प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करून प्राधिकरणांशी सुयोग्य समन्वय ठेवून पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आदेशित केले होते.या पार्श्वभूमीवर एलसीबीने एमपीडीए प्रमाणे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.या अनुषंगाने 3 सप्टेंबर रोजी एमपीडीए कायद्याप्रमाणे अंमली पदार्थ माफिया हैदर खान अन्वर खान रा. हरी फैल, खामगाव याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहे.या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन आठवड्यासाठी बुलढाणा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून त्यानंतर त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे जिल्हा पोलीस दल 26 जून पासून अंमली पदार्थ विरुद्ध मिशन परिवर्तन राबवीत असून, अंमली पदार्थाची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाजकंटक इसमावर कायदेशीर व कठोर, प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे.