चिखली (हॅलो बुलढाणा) अस्मानी सुलतानी संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांवर सातत्याने संकटे ओढावत आहे. अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याचे विदारक चित्र आहे. चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान आकाळ यांनी तहसिलदारांना निवेदन देऊन चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पिक विमा तातडीने मिळावा, अशी ठाम मागणी केली आहे.
तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने पेरणी केली होती. मात्र, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी एआयसी कंपनीकडे पिक विमा काढला असून, नुकसान झाल्यानंतर तक्रारी दाखल करून पंचनामेही करण्यात आले आहेत. तरीदेखील आजतागायत अनेक शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळाली असून बहुतांश शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत.
ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कर्ज, व्याजाचा वाढता बोजा आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली पिक विम्याची रक्कम तातडीने वितरित करणे गरजेचे आहे. किसान सेलचे अध्यक्ष समाधान आकाळ यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर शासन व प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि पुढेही उभा राहील. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ, असेही समाधान आकाळ यांनी सांगितले. निवेदनावर ६० शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.