बुलढाणा (हॅलो बुलडाणा / सचिन जयस्वाल) शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रायपूर पोलिसांनी आज दि. 02 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 5 दरम्यान दणदणीत रूट मार्च काढून गुन्हेगारांना कडक इशारा दिला. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर नागरिकांचा उत्साह वाढवणारा आणि गुंडांच्या छातीवर धडकी भरवणारा हा रूट मार्च ठरला.
मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायपूर पोलीस ठाणेदार सपोनि निलेश सोळंके, 11 पोलीस अंमलदार, RCP पथक बुलढाण्याचे तब्बल 21 पोलिस जवान आणि 32 होमगार्ड सहभागी झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवरुन शिस्तबद्ध तुकड्यांनी टाळेबंदीचा नजारा उभा करत पोलिसांनी आपली ताकद दाखवून दिली.
मागील आठवड्यातील सैलानी परिसरातील युवकाच्या हत्येनंतर काही तासांतच आरोपींना जेरबंद करून बुलढाणा पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात आपली कडक कारवाई दाखवून दिली होती. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा रूट मार्च गुन्हेगारांसाठी स्पष्ट इशारा आहे – कायदा मोडला तर पोलिसांच्या तावडीतून सुटका नाही! नागरिकांनी या रूट मार्चचे स्वागत करत पोलिसांच्या तयारीला दाद दिली असून गणेशोत्सव आणि ईदचे सण शांततेत पार पडावेत यासाठी पोलिसांचा खाक्या पुरेसा असल्याचे बोलले जात आहे.