बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील गजबजलेल्या कारंजा चौकात मध्यरात्री धक्कादायक चोरीची घटना घडली. दुर्गा माता मंदिरातील वजनदार दानपेटीच चोरांच्या हाती लागली. दानपेटी एवढी जड होती की ती उचलण्यासाठी किमान तीन ते चार जणांची आवश्यकता होती. म्हणजेच ही चोरी नियोजनपूर्वक टोळीने केल्याचे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे मंदिराच्या अगदी समोरच गणपती मंडळ सुरू आहे, तर मागील बाजूस उद्यानात विकासकाम सुरू आहे. गर्दीच्या भागात, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरांनी दानपेटी उचलून नेण्याचे धाडस दाखवणे हे प्रशासनासाठी मोठा सवाल आहे. मंदिरात व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांचे हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.दरम्यान, चोरीला गेलेली दानपेटी भोंडे सरकार चौकातील जुनी प्रबोधन शाळा परिसरातील टीन शेडमध्ये सापडली. मात्र, पेटीतील सर्व पैसे गायब असल्याचे निदर्शनास आले. श्रावण आणि गणेशोत्सवामुळे दानपेटीत मोठी रक्कम जमा झालेली असण्याची शक्यता असून, लाखोंचा गंडा झाल्याची चर्चा रंगत आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने पंचनामा सुरू केला असून, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणीला वेग देण्यात आला आहे.
दरम्यान, पवित्र मंदिरातील दानपेटीच चोरली जाणे हे शहरवासीयांच्या भावनांवर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेनंतर भक्तांमध्ये तीव्र रोष असून, पोलिसांनी तातडीने आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी होत आहे.