spot_img
spot_img

💥राज्यकर्त्यांवर ‘प्रहार!’ – माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले… ‘दिव्यांगांसोबत गद्दारी, म्हणजे ईश्वरासोबत गद्दारी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सत्ताधाऱ्यांनी आजवर दिव्यांगांची अवहेलनाच केलेली आहे. मात्र, प्रहारने दिव्यांगांची चळवळ उभी केली. आजवर माहिती नसलेला पाच टक्के निधी दिव्यांगांच्या पदरात पडत आहे. सात दिवस उपोषण करुन शासनाना मानधनवाढीचा निर्णय घ्यायला भाग पाडलं. मात्र, तेच मानधन सहा हजार रुपये झाल्याशिवाय बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही. ‘दिव्यांगांसोबत बेईमानी, म्हणजे ईश्वरासोबत बेईमानी’, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज असल्याचे सांगत, संघटनेतील कार्यकर्त्यांनाही दिव्यांगांच्या न्याय्य हक्कासाठी तुटून पडा, अशी कठोर ताकीद माजी मंत्री तथा बच्चू कडू यांनी दिली.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.मंत्री बच्चू कडून यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार हक्क यात्रा ३१ ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे पोहोचली. स्थानिक जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात पार पडलेल्या दिव्यांग मेळाव्यात बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, निलेश वटाने, प्रहार दिव्यांग क्रांतीच्या जयश्री गिते, राजेश पुरी, मुकेश राजपुत, अजित फुंदे, प्रहारचे वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख अजय टप, गजानन लोखंडकार, सुनील वाघ, गणेश काकडे, गणेश जाधव, सोणू वाघ, सुरेश जवंजाळ, नारायण महाले, विष्णु घाडगे, अमोल माळोदे, धिरज सरोदे, सचिन नेमाने, अजय शिंदे, बनकर, राहुल क्षिरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तिरंगा झेंड्याचे पुजन व वंदन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच दिव्यांगांच्या प्रश्नांवर एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षांपासून दिव्यांगांसाठी आपण लढत आहोत. ‘प्रहार’मुळे दिव्यांगांना अस्तित्व मिळाले आहे. काही स्वार्थी लोकं समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ही लढाई जात, पात, धर्म, पंथाची नसून वेदनेची आहे. दिव्यांगांना त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याची गरज असून २८ ऑक्टोंबरला मुंबईत होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाने सहभागी होण्याचे आवाहन करत ‘सहा हजार भेटल्याशिवाय शांत बसणार नाही’, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, राजेश पुरी, जयश्री गिते यांनी देखील विचार व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांची विशेषत: दिव्यांग महिलांची उपस्थिती होती.

▪️दिव्यांगाच्या हक्कासाठी २५० गुन्हे!

मेळाव्यात दिव्यांगांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतांना आपण आमदार असतांना एकुण आठ लक्षवेधी लावल्या आणि १८२ शासननिर्णय काढले. तसेच, दिव्यांगांसाठी लढतांना आपल्यावर सुमारे २५० गुन्हे दाखल झाले. संघटनेच्या अधिक मजबूतीसाठी आणि दिव्यांगांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. पैशे घेणाऱ्यांची लगेच हकालपट्टी केली जाईल. अपंगांसोबत बेईमानी करणाऱ्याला संघटनेत ठेवणार नाही,’असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

▪️संघटनेची नवीन दिशा!

संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच नवीन रचना जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला तीन जिल्हाप्रमुख देणार आणि संघटन नव्याने उभे करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. याशिवाय, दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही बच्चू कडू यांनी दिले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!