अमडापूर (हॅलो बुलडाणा) ३० वर्षांपूर्वीची एक घटना अखेर जीवघेणी ठरली. अमडापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खळबळजनक प्रकरणात काशीराम शिवराम कुसळकर (रा. अमडापूर) याने शेजारी गजानन बारकु पवार (रा. हरणी, ता. चिखली) याचा थरारक खून केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गजानन पवार व आरोपी काशीराम कुसळकर यांच्यात दीर्घकाळापासून वैर होते. तब्बल ३० वर्षांपूर्वी काशीराम कुसळकर याने आपल्या अल्पवयीन मुलीवर गजानन पवार याने अत्याचार केल्याची तक्रार अमडापूर पोलिसांत दिली होती. मात्र, न्यायालयीन सुनावणीनंतर गजानन पवार निर्दोष ठरला. तेव्हापासून आरोपी काशीराम सतत धमक्या देत असे – “तुला कोर्टाने सोडलं तरी मी तुला जिवंत सोडणार नाही”२७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास गजानन पवार आपल्या भावासोबत घरासमोर बसले होते. दरम्यान, तो शौचास जाण्याचे सांगून बाहेर पडला, मात्र बराच वेळ परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. त्यावेळी शेजारील जागेतून काशीराम कुसळकर हा घाईगडबडीत व घाबरलेल्या अवस्थेत बाहेर येताना दिसला. संशय आल्याने घरच्यांनी जागेवर धाव घेतली असता गजानन पवार रक्ताच्या थारोळ्यात, डोक्याला गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत मृतावस्थेत सापडला.
प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले की, जुन्या वैराच्या रागातून काशीराम कुसळकर याने गजानन पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.अमडापूर पोलिस ठाण्यात प्रकाश बारकु पवार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काशीराम कुसळकरविरुद्ध कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या खुनामुळे ३० वर्षांपूर्वीचे जुनं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.