संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) तालुक्यात काल भीषण अपघात घडला असून यात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृतांपैकी गणेश हरिदास ढोले (३२, रा. पाळोदी, ता. बाळापूर, जि. अकोला) हा आपल्या मावशीच्या अंत्यसंस्काराला आला होता. अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून परतीच्या वाटेवरच त्याच्यावर काळाने झडप घातली. दुसरा मृत्यू अजय सुनील लहासे (२२, रा. बावनबीर) या तरुणाचा झाला.
ही भीषण दुर्घटना २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास एकलारा–वरवट बकाल रस्त्यावर घडली. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक एवढी जोरदार होती की गणेश ढोले व अजय लहासे हे दोघेही जागीच ठार झाले. तर दीपक ढोले पाटील, जहीर खान, गजानन नागळे आणि रवींद्र कोकाटे हे गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थ व मित्रमंडळींनी जीवाचा आटापिटा करून तात्काळ ॲम्बुलन्स आणि खाजगी वाहनांच्या मदतीने जखमींना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे.अपघातानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. दुर्दैवाने, मावशीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या गणेशचा अंत्यसंस्कारावरून परत जाताना मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.