बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मोताळा महामार्ग पुन्हा एकदा रक्ताने लाल झाला! आज २७ ऑगस्ट रोजी राजूर घाट चढताना खडकी फाट्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या मलकापूर–छत्रपती संभाजीनगर बसने ८ ते १० मेंढ्यांना चिरडून टाकले. या भीषण अपघातात जागोजागी रक्ताचा सडा पडला असून, मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जनावरे रस्त्यावर तडफडून मरण पावली.
अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळ प्रशासन आणि वाहतूक विभाग जबाबदारी टाळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.