बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेशोत्सवाचे आज आगमन होत असून, मंगळवारी बाजारपेठेत गणेश मुर्ती घरी आणण्यासाठी व स्वागतासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीची लगबग दिसून आली. फुलांच्या माळा, सजावटीच्या रंगीबेरंगी झुंबर, मातीचे व कांस्याचे दीप, अगरबत्ती, तोरणे, शाडूमातीच्या मूर्ती, पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. मंगळवारी
बाजारपेठेत सकाळपासूनच खरेदीदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.सजावटीच्या दुकानात रंगीबेरंगी व पारंपरिक थीमच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात. घरगुती गणपतीसाठी छोटे देखावे, कृत्रिम तलाव, लायटिंग तसेच पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंनाही चांगली मागणी आहे. गणपतीच्या मूर्ती विक्रेत्यांकडेही शेवटच्या क्षणी गर्दी वाढली आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांनी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आकर्षक कृत्रिम फुलाच्या माळा व तोरण, थर्माकोल मंदिर, झिरमिळ्या, रिमझिम, लॉन, फुले आणि कमानी, कुंदन, टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारच्या साहित्याच्या खरेदीवर भाविकांचा भर आहे. आज २७ ऑगस्टला गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त उत्सुक आहेत. तत्पूर्वी घरासह परिसर स्वच्छ केला जात आहे. शहरात राहणाऱ्यांची पावले गावाकडे वळलेली आहेत. सार्वजनिक मंडळांनी सभामंडप उभारणीसह आकर्षक आरास निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गणेशोत्सव सजावटीसाठी गणेशभक्तांकडून नियोजन केले जात आहे. दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा या नागरिकांना आकर्षित करत आहेत. त्यामध्ये मणी आणि रंगीत धाग्याने बनवलेल्या माळांचादेखील समावेश आहे. सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगातील झिरमिळ्या उपलब्ध आहेत. विविध रंगातील प्लास्टिकची फुले विक्रीस उपलब्ध आहेत. विक्रेत्याकडून ग्राहकांच्या ग्राहकांच्या आवडीनुसार मखरासाठी लागणारी फुलांची कमान बनवून दिली जात आहे.
▪️यंदा 1385 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना
बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी शहरी आणि ग्रामीण भागात एकूण 1385 संभाव्य सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरी भागात 470 ग्रामीण भागात 925 गणेश मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी 307 गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिली आहे.