बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तब्बल 70 फुट खोल विहिरीत 6 फुट लांबीचा आणि 12 किलो वजनाचा महाकाय अजगर उदमांजर व तिचे पिल्ले खाण्यासाठी गेला होता.शिकार केल्यानंतर तो सुस्त पडला. दरम्यान एका जणाला विहिरीत तो निदर्शनास आल्याने सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले होते. सर्पमित्रांनी जीव धोक्यात घालून या अजगराला जीवदान दिले आहे. ही घटना
बिरसिंगपूर येथे 24 ऑगस्ट रोजी समोर आली.
साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. साप असा एक खतरनाक प्राणी आहे की, त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो. जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्या पासून लांब राहणे केव्हाही चांगले.
अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडले तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असते. असाच एक महाकाय अजगर बिरसिंगपूर येथील शिवाजी कड यांच्या शेतातील 70 फुट खोल विहिरीत आढळला.या अजगराने विहिरीत असलेल्या उदमांजर व त्यांच्या पिलांना गिळंकृत केले होते.शिवाजी कड यांना हे दृश्य दिसून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ व वन विभागाचे कर्मचारी खान तसेच सर्पमित्र, पवन मुळे प्रथमेश शिरसाठ घटनेबद्दल माहिती देऊन पाचारण केले. सर्पमित्रांनी खोल विहिरीत उतरून अजगराला सुरक्षित पकडले असून, या अजगराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.