चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमाला पोलिसांनी ठार धडक कारवाईत पकडले. दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी उशिरा रात्री अण्णा भाऊ साठे चौकात शुभम कांबळे हा इसम हातात लोंखडी कोयता घेऊन लोकांना धमकावत फिरत असल्याची माहिती चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार मा. संग्राम पाटील यांना गुप्त माहितीदारामार्फत मिळाली.
माहिती मिळताच ठाणेदार पाटील यांनी गस्त पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. तत्काळ पोउपनि नितीनसिंह चौहान, चालक पोउपनि अशफाक व पो.कॉ. सुनिल केसकर घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोलीसांनी पाहिले असता शुभम कांबळे हा हातात लोंखडी कोयता घेऊन उभा राहून परिसरात दहशत निर्माण करत होता. मात्र पोलिसांनी कसलीही विलंब न करता धाडसी कारवाई करत त्याला जागीच जेरबंद केले. त्याच्या ताब्यातील कोयता पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांचा हा कठोर इशारा मानला जात आहे. “चिखली शहरात कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा ठणकावता इशारा ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिला आहे.संपूर्ण कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक मा. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक मा. अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार संग्राम पाटील, पोउपनि नितीनसिंह चौहान व पो.कॉ. सुनिल केसकर यांनी दाखवलेले धैर्य नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे.