जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) निवडणुका आल्या की आजी-माजी लोकप्रतिनिधी गावातील भोळ्या- भाबड्या जनतेला विविध समस्या बाबत आश्वासनाची घुटी पाजून मोकळे होतात.भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेले मात्र आश्वासनाचा हा डोस या ग्रामस्थांना दिल्या जात असून, विविध मागण्यांपैकी या गावाला अद्यापही रस्ता नाही याचे नवल व्यक्त होत आहे.
जळगाव जामोद चे लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत आहे का? तालुक्यातील साडेसहाशे लोकसंख्या असलेल्या व रसलपुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या राजुरा बुद्रुक गावाला दळणवळणासाठी रस्ता सुद्धा उपलब्ध नाही. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे उलटले तरी रस्त्याची समस्या अद्याप कायम आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी नेमके करतात काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजुरा बुद्रुक हे गाव राजुरा लघु प्रकल्पाला लागूनच वसलेले आहे.येथील लोकसंख्या जवळपास 650 च्या आसपास आहे. या गावाला पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत निधी मिळत असून त्या निधीचा पुरेपूर वापर ठेकेदार करीत असून हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला दळणवळणा करीता अद्याप रस्ता उपलब्ध नाही.त्यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रस्ता बैल गाडीच्या चाकोरीचा असल्याकारणाने या रस्त्यावर मोठ-मोठी डबकी साचली आहेत. चिखल तुडवत शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या गावकऱ्यांनी शासनाला दर्जेदार रस्त्याची मागणी केली आहे. राजुरा बुद्रुक येथील जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेला रीतसर बोर्ड सुद्धा लावलेला नाही. शाळेचा परिसर सुद्धा अस्वच्छ व चिखलमय झालेला असून येथील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.याशिवाय इतरही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशी मागणी येथील ग्रामस्थ रमेश जमरा, रामलाल बंडल, रमेश वेरसिंग बोंडल,मुरली जमरा, संजय भेलसिंग बोंडल, मारोती मिसाळ, विनोद कनाशा,पुनमसिंग बोंडल, सुनिल चंगळ,आशिराम बोंडल,गिलदार बोंडल यांनी केली आहे.