बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील चिखली तालुका अंतर्गतच्या ग्राम किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत गेल्या 7 वर्षापासून दहावीच्या वर्गाला इंग्रजी,विज्ञान गणित या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थीनी आक्रमक झाले आहेत. दहावीच्या विद्यार्थिनींनी आज 21 ऑगस्टला दुपारी थेट जिल्हा परिषद गाठत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर शाळा भरवली. इंग्रजी,विज्ञान आणि गणित या विषयासाठी तात्काळ शिक्षक देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
चिखली तालुक्यातील किन्होळा या गावात मुस्लिम समाजातील विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत येथे जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल सुरू करण्यात आले. मात्र येथे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार येथे शिक्षक कमी आहेत.इयत्ता सहावी ते आठवी करिता इंग्रजी साठी एक शिक्षक आहे.त्यामुळे नववी ते दहावी करिता संपूर्ण विषयासाठी तीन शिक्षक नियुक्त करून देण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे.