बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शासनाकडून सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात हलगर्जी करणाऱ्या, कर्तव्यातील दिरंगाईसोबतच असुविधांचा कळस गाठणाऱ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १४ कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी एकाचवेळी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. देऊळगाव माळी, बोराखेडी, पिंप्री गवळी आणि उदयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आकस्मात भेटी दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बेशिस्त कारभार आणि अनियमितता आढळून आली. गलथान व अनागोंदी कारभार पाहता दोषींना निलंबित करण्यात आले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना ‘चुकीला माफी नाही’ असेच या कारवाईतून सीईओ खरात यांनी अधोरेखित केले.
दहाच्या आत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील ३५ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी निलंबित केल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली. बुलढाणा जिल्हा परिषदेच्याच नव्हेतर राज्यातील जिल्हा परिषदांच्या इतिहासातील ही ऐतिहासिक कारवाई ठरली. आता सीईओंनी आरोग्य खात्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जे कोणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कर्तव्याला जागणार नाहीत, जनसामान्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सोयी, सुविधांबाबत हलगर्जी करतील, अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा निलंबनाच्या कारवाईतून देण्यात आला आहे. कर्तव्याला प्राधान्य न देणाऱ्या आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी सीईओंनी निलंबनाच्या ‘कारवाईचे इन्जेक्शन’च लावल्याच्या प्रतिक्रिया या कारवाईनंतर जनतेत उमटल्या आहेत.
चार दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी, जानेफळ, चिखली तालुक्यात येणाऱ्या उदयनगर तसेच मोताळा तालुक्यातील बोराखेडी व पिंप्री गवळी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. जानेफळ वगळता चारही केंद्रात अनियमिततेचा बाजार पाहायला मिळाला. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याबद्दल सीईओंनी खंत व्यक्त केली.
उदयनगरमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर मुख्यालयी अनुपस्थित राहात असल्याबाबत तसेच कार्यालयात स्वच्छता न ठेवणे, कार्यालयात रजिस्टर अद्ययावत व प्रमाणित न करण्याच्या बाबी समोर आल्या. आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये व आवारातील अस्वच्छता ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आणि रुग्णांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याने डॉक्टर, आरोग्य सेविका आणि कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सीईओंनी कारवाईच्या आदेशात नमूद केले.
▪️तपासणीतील गंभीर बाबी
चारही आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा कक्षाची दयनीय अवस्था, दरवाजे नादुरुस्त आढळले. औषधसाठा अस्ताव्यस्त दिसून आला. रुग्ण कक्षातील बेडशीट घाणेरड्या आढळल्या. एनसी ट्रॅकर रजिस्टर अद्ययावत व प्रमाणित नव्हते. एनसी मदर ट्रॅकिंग रजिस्टर अर्धवट व अस्ताव्यस्त होते. एनसीडीबाबत कोणतीच माहिती कर्मचारी देऊ शकले नाहीत. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली. आरोग्य सेविका इन्जेक्शनच्या काचा खिडकीमध्येच टाकत असल्याचे आढळले.
▪️निलंबित केलेले डॉक्टर, कर्मचारी
देऊळगाव माळी – डॉ. विशाल सुरुशे (वैद्यकीय अधिकारी) व अन्य एक कर्मचारी
उदयनगर – क्षितिज पवार (कनिष्ठ सहायक), सूरज खरात (परिचर)
बोराखेडी – डॉ. विवेक थिगळे (वैद्यकीय अधिकारी), सागर जाधव (औषध निर्माण अधिकारी), अर्चना राऊत (स्वास्थ्य अभ्यागता), कोमल राठोड (आरोग्य सेविका), संगीता देशमुख (आशा वर्कर)
पिंप्री गवळी – प्रियंका इंगळे (आरोग्य सेविका), दीपाली सोनुने (आरोग्य सेविका), गीता बर्वे (आरोग्य सेविका), सुजाता गायकवाड (आशा वर्कर), ज्योत्स्ना खोले (आशा वर्कर)
▪️जानेफळ ‘पीएचसी’चे कौतूक
कर्तव्यदक्ष राहून कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर गुलाबराव खरात यांनी नेहमीच शाब्बासकीची थाप दिल्याचे दिसून आले. तर कर्तव्यनिष्ठतेचे पालन न करणाऱ्यांना कठोर शिक्षा, असे पारदर्शक धोरण त्यांनी अवलंबिले आहे. तपासणीदरम्यान जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता सर्व काही व्यवस्थित आढळून आले. त्याचक्षणी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे सीईओंनी कौतुक केले.