बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ प्रशांत खंडारे) पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती कधी आणि कुणावर ओढावणार हे सांगता येत नाही. यावर्षी मे ते ऑगस्ट या 4 महिन्यात वीज पडून, पुरात वाहून व अन्य कारणाने जिल्ह्यातील 13 जण नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरले आहेत. याशिवाय या वर्षात आतापर्यंत 70 मोठी तर 35 लहान अशी एकूण 105 जनावरे नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडली आहे.तसेच 882 अंशतः तर 7 पूर्णतः घरांची व 21 गोठ्यांची पडझड झाली आहे.विशेष म्हणजे जिल्हा यंत्रणेने काहींना मदत वितरित केली तर अनेक जण मदतीपासून वंचित आहे.ही नैसर्गिक हानी बघता ‘लहरी पावसाळा जीव सांभाळा’ असेच सांगण्याची वेळ आली आहे.
यावर्षी बुलढाणा जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे.शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान मेहकर तालुक्यात एकूण 650 घरांमध्ये पूराचे पाणी शिरले.त्यापैकी 203 लाभार्थ्यांना सानुग्रह 10,1500 रुपयांची मदत वाटप करण्यात आली तर उर्वरित लाभार्थ्यांना निधी वाटपाची कार्यवाही सुरू आहे.लोणार तालुक्यातील एकूण 36 घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना पाच हजार रुपये प्रमाणे 1,80,000 सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. या वर्षातील मे महिन्यात लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर गावात व शिंदी गावात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.मेहकर तालुक्यातील चायगाव येथेही एकाचा वीज पडून मृत्यू झाला.खामगाव तालुक्यातील घारोडे येथे एकाचा पूरात वाहून गेल्याने बळी गेला.तसेच जून महिन्यात मेहकर तालुक्यातील शेंदला येथे भिंत पडून एक जण दगावला.यास तालुक्यातील दादुल गव्हाण येथे एक जण पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली तर देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी येथे वाऱ्यामुळे टीनपत्रे ,लोखंडी अँगल व दगड पडून एकाचा जीव गेला.जुलै महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे एक जण पुरात बुडाला. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे देखील पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली.बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे देखील पुरात वाहूनगेल्याने एक जण दगावला आहे.ऑगस्ट महिन्यात खामगाव तालुक्यातील घारोड येथे वीज पडून एकाचा तर चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथे एकाचा पुरात वाहून अंत झाला.जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ खुर्द येथे पुरात वाहून एकाचा मृत्यू झाला आहे.तसेच खामगाव तालुक्यातील घारोड येथे विज पडून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
▪️शासनाची तिजोरी रिकामी
लाडकी बहीण योजनेमुळे सध्या शासनाच्या तिजोरीत ठणठणाट दिसून येतोय.अनेक योजनांमधील लाभांपासून लाभार्थी वंचित आहेत.दरम्यान नैसर्गिक आपत्ती ओढावल्यामुळे काही अपवाद वगळता पात्र लाभार्थीअजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.