बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पावसाने दोन- तीन दिवसांपासून जिल्ह्यात धुमशान घातले आहे. तब्बल 12 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.काल रात्री पासून अद्यापही ब्रेक के बाद.. पाऊस बरसतच आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध भागातील नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने तरारलेली शेतीपिके पाण्याखाली गेली त्यामुळे श्रमाची माती होऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात पूर दिसयाला लागला असून, यंत्रणेचे पंचनामे गाळात रुतल्याचे गंभीर चित्र आहे.
शनिवारच्या पावसाने सिंदखेड राजाला चांगलेच झोडपले.या तालुक्यातील जांभोरा येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशी, फळबागा, भाजीपाला आदी पिके पाण्याखाली येऊन उध्वस्त झाली आहे. फुटलेल्या तलावामुळे शेतात मोठमोठे भगदाड पडले.सिंचन विभागाने हा तलाव बुजविण्यासाठी प्रयत्न केला परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही.
चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील युवक वटसावित्री नदीपात्रात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.साखरखेर्डा शिवारात वीज पडून बैल ठार झाला तसेच
खडकपूर्णा प्रकल्पाचे 9 वक्रद्वार उघडण्यात आले तर पेनटाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 761 मिमि आहे. त्या तुलनेत आतापर्यंत 418 मिमि म्हणजे 54.96 टक्के पावसाची शासन दप्तरी नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही गावातील नागरिकांच्या घरात पाण्याने शिरकाव केल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा यंत्रणेने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.