जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील सुनगाव गावात घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. केवळ दीड वर्षांच्या निष्पाप बालिकेवर गावातीलच ५५ वर्षीय मधुकर पुंजाजी हागे या विकृताने लैंगिक अत्याचार केला आहे. या अमानुष कृत्याने गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मधुकर पुंजाजी हागे हा फिर्यादी महिलेच्या घरात आला. ‘आंबा खायला देतो’ असे सांगत त्याने तिच्या केवळ दीड वर्षांच्या मुलीला आपल्या घरी नेले. साधारण अर्ध्या तासानंतर मुलीला रडत अवस्थेत परत आणले. मुलीच्या आईला संशय आल्याने बालिकेची तपासणी केल्यावर तिच्या अंगावर लालसरपणा व संशयास्पद स्त्राव आढळून आला. यानंतर मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आणि पीडितेच्या आईने जळगाव जामोद पोलिसांत धाव घेतली.या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायम अप क्र. 373/2025 अंतर्गत कलम 64 (1), 65 (2) बीएनएस तसेच पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ठाणेदार निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे दरम्यान, या घटनेने गावात प्रचंड संताप उसळला असून आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. एका निष्पाप बालिकेवर झालेल्या या अमानुष कृत्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे.