वैरागड ता.चिखली (हॅलो बुलडाणा) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी अपहाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. विविध विकास कामांसाठी लाखो रुपये खर्च दाखवत, ठराविक एजन्सी व एजंटांच्या नावावर व्हाउचर काढण्यात आले असून, अनेक कामे केल्याचे दाखवून प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री खर्च दाखवला गेल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत.
ग्रामपंचायतीच्या सामान्य निधी, पाणीपुरवठा, 15 वा वित्त आयोग, व्यायामशाळा, दलित वस्ती सुधार योजनांतील निधीचा गैरवापर केला गेला आहे. कचरा कुंडी, फॉगिंग मशीन, शौचालये, स्मशानभूमी, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, संगणक खरेदी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सौंदर्यीकरण यासारख्या कामांमध्ये बोगस बिले काढण्यात आली. काही एजन्सी व कर्मचाऱ्यांच्या नावावर टेंडरही न काढता थेट बिले करण्यात आली. विशेष म्हणजे सचिव रजेवर असताना देखील 2.83 लाखांचे बिल काढण्यात आले!
या सर्व प्रकरणाची लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे दिल्यानंतरही महिनाभरात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संशय अधिक बळावला आहे. याविरोधात ग्रामस्थांनी 21 जुलै रोजी अमरण उपोषण केले तरीही सचिव वैद्यकीय रजेवर गेल्याची शंका अधिक तीव्र झाली आहे.तरी याप्रकरणात स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करून दोषींवर निलंबन व निधी वसुलीची तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.