बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला असल्याचे चित्र आहे. 31 पेक्षा जास्त डेंगूचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत परंतु निश्चित आकडा अजूनही आरोग्य विभागाकडे नाही. जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने साथरोगाच्या रुग्णांचे परिणामकारक सर्वेक्षण होण्याविषयी साशंकता आहे. यामुळे या साथ रोगाचे रुग्ण बळावण्याचा धोका वाढला आहे.
शासनस्तरावरून हिवताप अधिकारी कार्यालयाकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब ठरली आहे.पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाढणारा डासांचा प्रादूर्भाव आणि दुर्गंधी ही बाब जलजन्य आजारास कारणीभूत ठरणारी आहे. मलेरिया, डायरिया यासह डेंग्यूसारखे गंभीर आजार मोठ्या प्रमाणात फैलावण्याची भीती आहे. हा आजार होऊ नये यासाठी जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी हिवताप निर्मूलन विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. आस्थापना विभाग ते प्रत्यक्ष गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाणवा या विभागात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक आदी ठिकाणी सेवा देण्यासाठी हिवताप विभागाकडे आवश्यक तेवढे कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे.
▪️ अशी आहे रुग्णांची आकडेवारी..
बुलढाणा जिल्ह्यात एक एप्रिल ते मे जून दरम्यान डेंग्यूचे 31, चिकनगुनियाचे 2, टायफाईडचे 165, तापीचे 84, पुरळ येणारी ताप 32 आणि अतिसाराचे 1245 रुग्ण आहेत. अशी नोंद आरोग्य विभागाकडे आहे. या संख्येमध्ये आता वाढ झाली आहे.