चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली-जालना रोडवरील महाबीज जवळ काल रात्री 10:15 वाजता एक दुर्दैवी अपघात घडला असून, या भीषण अपघातात दुचाकीस्वार इम्रान खान सनाउल्ला खान (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. इम्रान हे मूळचे खामगावचे असून हल्ली गजानन नगर, चिखली येथे भाड्याने राहत होते.अपघाताच्या वेळी ते त्यांच्या हीरो एचएफ डिलक्स दुचाकीवरून चिखलीहून मेहकर फाट्याकडे जात होते. मात्र, महाबीज परिसरात त्यांचा भीषण अपघात झाला. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला असून, शवविच्छेदनासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे हलवण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंधार, वेग, किंवा वाहनांची टक्कर – यापैकी काय कारण होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पुढील तपास सुरू आहे.