मेहकर (हॅलो बुलडाणा) कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही मेहकर मतदारसंघात विकासाचे घोडे अडलेलेच असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचाच एक भाग लोणार -अंजनी खुर्द रस्त्यची दुरावस्था आहे.सांगा साहेब..’शाळेत जायचे कसे?’ असा प्रश्न विद्यार्थी आता विचारत आहे.
सदर रस्त्यावर पिंपळखुटा (मापरी), कोयाळी (दहातोंडे),उदनापूर, वाल्हूर ही गावे आहेत. अंजनीखुर्द, कारेगाव या गावांना लोणारला जाण्यासाठी हाच मार्ग आहे. शहराच्या ठिकाणी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. लोणार ते अंजनी खुर्द रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्गच उरला नाही. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर शाळा – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे.मेहकर मतदार संघात करोडो रुपयांचा निधी खेचून आणला अशा वल्गना केल्या गेल्या. मग हा निधी कुठे खर्च झाला हा प्रश्न जनमानसांत निर्माण झाला आहे. तरी या संदर्भात लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.