बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहराच्या हृदयस्थानी असलेला ‘कारंजा चौक’ एकेकाळी ज्याने दिग्गज राजकारणी आणि कर्तबगार अधिकारी घडवले, तोच चौक आज खड्ड्यांनी पोखरलेला आहे. मुख्य रस्त्याच्या मध्यभागी पडलेला प्रचंड खड्डा हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाची आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार कामाची जिवंत साक्ष देतो.
सध्या शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू आहेत, पण गुणवत्तेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रस्त्यांची ‘वॉरंटी’ जेमतेम सहा महिन्यांची आणि ‘गॅरंटी’ म्हणजे निम्म्या पावसात रस्ता खराब होणारच! ठेकेदाराकडून बोगस साहित्याचा वापर करून थातूरमातूर काम केले जाते. पैसा वाचवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळले जाते.या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला कोर्ट, पोलीस मुख्यालय, पोस्ट ऑफिस आणि मोठा बाजार परिसर आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आला आहे. पावसात तर हे खड्डे मृत्यूचे सापळे बनतात.
शहराच्या मुख्य चौकाची वाहन पार्किंग नसल्याने कोणी कुठे ही आपली वाहने उभी करतात ही दयनीय अवस्था म्हणजे स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या अपयशाचा आरसा आहे. नागरिक कर भरतात, पण बदल्यात मिळते असुरक्षितता, त्रास आणि प्रचंड संताप!
वाहतुकीचा बोजवारा आणि नागरी सुविधांचा अभाव – प्रशासनाचे दुर्लक्ष?
नेहमी गजबजलेला कारंजा चौक ते बाजार लाईन, कोर्ट रोड, भोंडे चौक, पोलीस मुख्यालय मार्ग या रस्त्यांवर दुकाने असून पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनचालक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी रस्ते अरुंद होत असून शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध यांना चालण्यास अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत अपघात होण्याचा धोका वाढला असून हे दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते. विशेष म्हणजे या भागात शासकीय कार्यालये, बाजारपेठ असल्याने रोज हजारो नागरिकांची ये-जा असते. परंतु इतकी गर्दी असलेल्या चौकात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नाही. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पार्किंग व स्वच्छतागृहाची तात्काळ व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.