देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) खडकपूर्णातून प्रचंड प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक होत असून महसूल पथक थातूरमातूर कारवाई करत आहे.बोटी द्वारे वाळूचा उपसा केला जात असून, मंडपगावातील रस्ते वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर मुळे खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक न थांबल्यास 28 जुलैपासून अमरावती आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा युवा सेनाचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व सरपंच भीमराव कदम यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
खडक पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा गेल्या काही वर्षात वाढला आहे. जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही केवळ थातूरमातूर कारवाई करून दिखावा केला जात असल्याचा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होणारा अवैध वाळू उपसा ही चिंतनीय तेवढीच गंभीर बाब आहे.परंतु या जटील होत असलेल्या समस्येच्या मुळाशी घाव घालणे जरूरी आहे.टिप्पर वाहतुकीमुळे शेत रस्ते आणि गावातील रस्त्यांची वाट लागली आहे.शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही.या धोकेदायक रस्त्यामुळे अनेकांचे अपघात झाले तर अनेकांना अपंगत्व आले.ग्रामस्थांनी वाळू माफियांना प्रेमाने जरी सांगितले तर ते अंगावर धावून येतात.पोलीस कॉन्स्टेबल व तलाठी मंडळ अधिकारी यांना सुद्धा त्यांनी चोप दिल्याचे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिले.प्रशासनातील काही झारीचे शुक्राचार्य असणारे अधिकारी रेतीत हात काळे करत असल्याचाही आरोप संतोष भुतेकर यांनी निवेदनातून केला आहे.दरम्यान ज्यांच्या बोटी आहेत ज्यांच्या शेतात वाळूमुळे गड्डे पडलेत,ज्यांच्या शेतातून रस्ते आहेत त्यांच्यावर तात्काळ बोजा चढवावा आणि क्षेत्र रस्त्यांची एक समितीने म्हणून पंचनामा करून अहवाल मागवावा,गावातून रिकामे वाळू वाहन जरी दिसले तरी कारवाई करण्यात यावी,ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाळू उपसा होतो अशा तलाठी मंडळ अधिकारी व पोलीस पाटील यांना तात्काळ निलंबित करावे व सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी,पोलीस ठाणे मार्फत वाळू माफी यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी,यासंदर्भात तत्पूर्वी बोजा चढवणे संदर्भात जे प्रशासनाने आदेश काढले होते त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही.या व इतर मागण्या पूर्ण केल्यास 28 जुलैपासून विभागीय आयुक्त कार्यालय समोर सहकाऱ्यांसह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष भुतेकर यांनी दिला आहे.