मोहना खुर्द/मेहकर (हॅलो बुलडाणा/ गणेश ताकतोडे) गावाच्या चारही बाजूंनी घाणीचे साम्राज्य पसरले असून, पावसामुळे पाणी तुंबलेले आहे. त्यातून डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांची भीती निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याकडे गट ग्रामपंचायतीचे लक्ष नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
गावातील रस्ते खड्डेमय झाले असून, तुंबलेल्या नाल्यांमुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातून उठणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे जीवन नकोसे झाले आहे. काही जागरूक युवक स्वतःहून धूरफवारणी करत आहेत, मात्र ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पथदिव्यांचा अभाव असल्यामुळे रात्रीच्या वेळेस महिलांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.